गिरिधर माझा (भाग - १)

अल्हाची माझ्यावर जन्मापासुनच रेहमत होती. काय नव्हत माझ्याजवळ! हिंदुस्थानचा मी अभिशिक्त सम्राट

होतो, स्वत:हाच्याच मुलासारखी माझी प्रजा, जीवास जीव लावणाऱ्या कितीतरी बेगम, नऊ रत्नांनी मढवलेला दरबार, सतत वाढत चाललेल साम्राज्य, आणि जगातल सर्वात शक्तीशाली असलेल सैन्य. सुख समृध्दींचा जणु सडाच माझ्या अवतीभवती पडला होता.

रोजच दरबारात तिची किर्ती ऐकायला मिळायची. तिच्यामधे अस काय आहे हे मला कळतच नव्हत. शेवटी अति उत्चुकतेमुळे मी तिची परिक्षा घेण्याचा निर्धार केला. सकाळची सगळी आन्हीक आटपुन मी अल्हाच्या प्रार्थनेला बसलो. अल्हाची रेहमत नेहमीच माझ्यावर राहावी म्हणून मनोमन त्याला आशिर्वाद मागितला. कारण आम्ही शत्रूराज्यात शिरणार होतो. नमाज संपवुन मी वेषभुशेच्या तयारीला लागलो. एव्हाना तानसेन पण आला, त्याच्या वेषभुशेची तयारी दुसऱ्या कक्षात केली होती. सलाम करून तो वेषभुशेच्या सिध्दतेला निघुन गेला. जोधा बेगम वेषभुशेत सर्वोतपरी मदत करत होती. आम्ही ब्रम्हणाच्या वेषात शत्रुराज्यात प्रवेश करणार होतो. माझी वेषभुशा अश्याप्रकारे केली गेली होती की स्वतःला बघुन थक्क झालो. मला बघितल्यावर कुणीही म्हटल नसत की मी हिंदुस्थानचा सम्राट अकबर आहे. सम्राटाचा थोडासुद्धा लवलेश त्या वेषभुशेमुळे माझ्यात उरला नव्हता. तानसेनाला सुद्धा ओळखतांना मला थोडे कष्ट पडले.

सूर्य निघाण्याच्या आतच मी आणि तानसेन गुप्त मार्गाने नगराबाहेर पडलो. आम्हाला अजुन दोन तीन दिवस प्रवास करायचा होता. दोन दिवसांच्या अथक प्रवासानंतर एका सुरम्य सायंकाळी आम्ही शत्रुंच्या मेवाड या राज्यात पोहोचलो. मला बाहेर उभ करून तानसेन आमची राहायची सोय करून परत आला आणि मला म्हणाला
"चला जहाँपनाह, आपली राहायची सोय झालीय"
"तानसेना! मला ईथे जहाँपनाह म्हणू नकोस" दबक्या आवाजात मी म्हणालो.
"क्षमा असावी. चला आपण निघुया" तानसेन म्हणाला.

धर्मशाळेत झालेली सोय ही एका सम्राटाला कधीच मान्य नव्हती. पण तिची भेट खरोखरच तेवढ्या मोलाची ठरणार होती की नाही, याबाबत मात्र मी काहीसा सांशकच होतो. रात्री पडल्या पडल्या मला झोपच येईना. एक खुपच जुनी घटना मनाच्या आवर्तात ठाण मांडून बसली होती, आणि वारंवार तीच घटना मनक्ष्चक्षूपुढे वावरत होती.

एकदा मी आणि सगळे मंत्रीगण दरबारात नुकतेच कचेरीचे काम उरकवून चर्चा करत बसलो होतो. त्या दिवशी एका अपराध्याला शिक्षा मी सुनावली होती. माझ्या निर्णयक्षमतेवर सगळेच दरबारी माझी तारीफ करत होते, पण एकटा बीरबलच तो शांत बसला होता. जेव्हा मी त्याला त्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला
"जहाँपनाह, आपण ही शिक्षा सुनाऊन कोणतही मोठ कार्य पार पाडलेल नाही. म्हणून मी तुमची कसलीही खोटी तारीफ करणार नाही"

सगळा दरबार अवाक् होऊन बीरबल कडे बघत होता. मी थोड्याश्या रागाच्या भरात पुढे बोलु लागलो
"किती तरी दिवसांनी खोळंबलेली ही कचेरी मी आज मार्गी लावली, आणि तु म्हणतोस की मी कोणतही मोठ काम केल नाही"
"हो जहाँपनाह..." बीरबल उत्तरला.
"अरे, मी या हिंदुस्थानचा अभिशिक्त सम्राट आहे. कितीतरी लढायांमध्ये मी पराक्रमाची शर्थ केली आणि स्वबळावर हे राज्य मिळवल आहे. माझ राज्य दिवसेंदिवस वाढतय. माझ्या प्रजेचा मी माझ्या मुलासारखा सांभाळ करतो, त्यामुळेच प्रजा संतुष्ट आहे. आणि ईतक सगळ असुनही तुला मी श्रेष्ठ वाटत नाही?" मी काहीश्या अभिमानाने म्हणालो.
"हो जहाँपनाह, ईतक सगळ करूनही तुम्ही नक्कीच श्रेष्ठ नाही. पण तुमच्याहूनही श्रेष्ठ अजुन एक व्यक्ती आहे" बीरबल उत्तरला.
"कोण आहे तो जो माझी बरोबरी करू शकतो?" मी काहीश्या रागाच्या भरात विचारल.
"माझ्या भाषेत त्याला ईश्वर म्हणतात आणि तुमच्या भाषेत खुदा" बीरबल विश्वासाने उत्तरला.

सगळ्या दरबारात हश्या पिकला. दरबारी पोट धरून हसु लागले. मला पण बीरबलची कीव आली. माझाही माझ्या खुदावर प्रगाढ विश्वास होताच, तरीपण मला माझी गोष्ट बरोबरच सिध्ध करायची होती, आणि आज मला बीरबलला नमवायची आयती संधी चालुन आली होती.
"बीरबल, खुदा किवा ईश्वर फक्त माणसाच्या मनाची कल्पना आहे. त्याला कधी कोणी बघीतलही नाही, मग तो माझ्याहूनही श्रेष्ठ कसा?" मी म्हणालो.
"कारण जहाँपनाह, खुदा ते करू शकतो जे तुम्ही करू शकत नाही" बीरबल उत्तरला.
"अस काय आहे जे तुझा खुदा करू शकतो पण मी करू शकत नाही" मी उपहासाच्या स्वरात म्हणालो.

बीरबल काहीश्या विचारात पडला. संपुर्ण दरबारात अजुनच हश्या पिकला, त्यामध्ये मी पण सामील झालो.
"जहाँपनाह, तुम्ही या माझ्या आसनांवर बसु शकता का?" काहीसा विचार करून बीरबल मला म्हणाला.
"मी तुझ्या आसनावर बसु! बर... बसतो... तुझ्या आसनांवर बसतो" मी पुन्हा उपहासाच्या स्वरात उत्तरलो आणि जागेवरून उठुन त्याच्या आसनांवर बसलो. सगळेच दरबारी आपले हसु दाबण्याचा प्रयत्न करत होते.
"बर आता पुढे काय?" मी पुढचा प्रश्न केला.

बीरबल सरळ माझ्या सिहासनांजवळ गेला आणि त्यावर आरूढ झाला. सगळा दरबार अवाक् होऊन बघतच राहीला. माझी तळपायाची आग मस्तकात गेली.
"हा काय मुर्खपणा चालवला बीरबल?" मी कडाडलो.
"जहाँपनाह, मी तर फक्त तुमच्या प्रश्नाच उत्तर देतोय" बीरबल उत्तरला.
"हे कसल उत्तर बीरबला? हा काय प्रकार चालवलाय तु?" मी पुन्हा कडाडलो.
"जहाँपनाह, हेच तर खुदाच काम आहे. एका क्षणात तो वरच्याला खाली उतरवतो आणि खालच्याला वरती पोहोचवतो, आणि तेही त्यांना कळू न देता" बीरबल हसून उत्तरला.

सगळा दरबार शांत झाला. झालेला सगळा प्रकार थक्क करणारा होता. मी आसनांवरून उठलो, तोपर्यंत बीरबल सिहासनावरून उतरून माझ्याजवळ आला. आज माझा गर्व बीरबलाने पुर्णपणे हरण केला होता. बीरबलाने म्हटल्यापेक्षा माझ्या अल्हाने तो हरण केला होता. माझ्या गळ्यातली मोत्यांची माळ काढुन मी त्याच्या गळ्यात टाकली आणि दरबार तिथेच समाप्त झाल.

एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस होता. जिच्या भेटीसाठी मी ईथे आलो होतो तिची किर्ती असाधारण होती. दरबारात आलेल्या प्रत्येक याचक, विद्वान, ब्राम्हण ईत्यादी तिची मन भरून स्तुती करायचे. सर्वच धर्माविषयी माझ्या मनात खुप आदर होता. एक राजा म्हणुन नाही, एक माणुस म्हणुन पण नाही, तर एक भक्त म्हणुन. पण हिंदु धर्माविषयी मला विषेश ओढ होती.

दरबारात आलेला एक ब्राम्हण तिची स्तुती करतांना म्हणाला होता, की ती श्रीकृष्णाची निस्सीम् भक्त आहे. तिच्या ध्यानी मनी फक्त श्रीकृष्णच वावरतो. जरी तिचा विवाह झाला असला, तरीही ती श्रीकृष्णालाच आपला पति मानते. तिच्या डोळ्यात, तिच्या श्वासात, तिच्या शब्दात, तिच्या गायलेल्या स्वरात, भान विसरून नाचतांना तिच्या फरक पडलेल्या वागण्यात फक्त श्रीकृष्णच असतो. मला हे सगळ पहिले विचित्रच वाटल. कारण या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसंन शक्यच नव्हत. असली कुठली गोष्ट त्या ब्राम्हणाला तिच्यामधे दिसली तेच मला कळत नव्हत. विचारांच्या तंद्रित मला केव्हा झोप लागली मला माझेच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून आम्ही सगळी आन्हीक आटोपली. सुर्य वर आला होता तेव्हा आम्ही धर्मशाळा नुकतीच सोडली होती. जिला आम्ही ईथवर शोधत आलो होतो, ती मंदिरातच भेटेल अस आम्हाला समजल होत. पत्ता विचारत विचारत आम्ही श्रीकृष्ण मंदीराजवळ पोहोचलो. संपुर्ण मंदिराचा परिसर हिरवळीने भरून गेला होता. लतावेलींच्या सुगंधाने आणि पक्षांचा किलबिलाटाने सभोवतालच वातावरण प्रसन्नचित्त होऊन गेल होत. मंदिराच्या बाजुलाच काही गोशावक आपल्या मातेला बिलगून दुग्धपान करीत होती. त्यांच्या कंठातील घंटिकांचा मंजुळ नाद वातावरणातील पवित्र्यात भर घालत होता.

मंदिरात कुणीतरी नुकतच भजन संपवल होत. मंदिरातला सगळा जमाव बेधुंदपणे नाचत होता. मंदिराच्या पायऱ्या चढून आम्ही मंदिरात प्रवेश केला. मी प्रथमच हिंदूच्या मंदिरात पाय ठेवला होता. तिथल्या प्रसन्नचित्त वातावरणाने मन हरवून गेल होत. एका वेगळ्याच गोष्टीचा अनुभव येत होता, पण ती गोष्ट काय हे मात्र कळल नव्हत. मी तानसेनाकडे बघितल, तो माझ्याच आज्ञेची प्रतिक्षा करत होता. मी त्याला मानेनेच होकार देत पुढे बोलण्याची आज्ञा दिली. सगळ्या जमावाला ऐकु जाईल अश्या मोठ्या वाणीत तानसेन गरजला.
"कुठे आहे ती?"

सगळा जमाव तानसेनाच्या आवाजाकडे वळला. तो पुढे बोलु लागला.
"जिची किर्ती संपुर्ण भारतदेशात पसरली आहे. जिच्या भजनाने लोक स्वतःच भान हरपून बसतात. जी स्वतःला अलौकीक श्रीकृष्ण भक्त म्हणवते. जी स्वतःला श्रीकृष्णाची अर्धांगिनी मानते. लोक म्हणतात, तिच्या गायनाने कर्ण सुखावतात, मन तृप्त होऊन जाते, स्वतःचा तोल ढासळतो आणि जीव आपोआप नाचत सुटतो, गात सुटतो. मी तिची परिक्षा घ्यायला आलो आहे. कुठे आहे ती?"

सगळा जमाव कान देऊन ऐकत होता. कारण तानसेन तेवढ्याच रागाने बोलला होता.
"पण ब्राम्हणबुवा, तुम्ही कोण?" त्यातल्याच एकाने प्रतिप्रश्न केला.

"मी! मी स्वामी हरीदास यांचा शिष्य. मी! जो मेघ मल्हार राग गाऊन पाऊस पाडु शकतो. मी! जो दिपक राग गाऊन अग्नी प्रज्वलीत करू शकतो. मी! ज्याने अकबरच्या दरबारात जाऊन माहान गायक तानसेनाचा संगीतमय युद्धात पराभव केला. असा मी, तिला आव्हान द्याला आलो आहे. कुठे आहे ती? कुठे आहे..... मीराबाई!!!
क्रमश:

उपसंहार
"गिरीधर माझा" ही कथा कोणाची हे तर आता तुम्हाला कळलच आहे. या भाग लिहीतांना मला अस वाटल की अजुनही ही कथा सुरूच झाली नाही. पण पुढच्या भागात ही कथा नक्कीच सुरू होईल आणि त्यामधे अकबरच्या भेटीच प्रयोजनही तुम्हाला कळेल. एका स्त्रीच्या दृष्टीकोणातुन ही कथा लिहीने खुपच मोठ आव्हान होत, म्हणुणच या भागासाठी मी ही कथा अकबरच्या साथीने मांडली. पण पुढच्या भागात मला ह्या कथेचा पुष्कळसा भाग एका स्त्रीच्याच दृष्टीकोणातुनच मांडायचा आहे, पण तो भाग मला जमला की नाही हे वाचकच ठरवतील. प्रेमाच एक खुपच आगळवेगळ स्वरूप पुढच्या भागात मी ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामधे प्रेम, त्यातला आनंद, त्यातला विरह आणि त्यातली ओढ मी त्या भागाव्दारे प्रस्तुत करेल. आशा करतो तो भाग तुम्हाला अधिक आवडेल. मीराबाईचे प्रसिध्द दोह्यामधला, एक दोह्याचा मराठीत अनुवाद करण्याचा एक मोडका-तोडका प्रयत्न मी खाली केला आहे, आशा करतो तो तुम्हाला आवडेल.

हाक मनाची ऐक सावळ्या,
विनती तुजला फक्त माझी,
बसुनी त्या वाटेवर एकटी,
वाट फक्त पाहतेय तुझी

श्यामल रंगाचा एक धागा
अलगद मनावरी तुच विनला
सोडवु तरी कसा रे मी
घनश्याम निळ्या तुच सांग ना

हळुवार स्पर्श त्या मोरपिसाचा
गालावरती उमटूनी गेला,
अवघा ग्रिष्म असतांनाही
मनात वसंत फुलवून गेला
(राह तके मेरे नैन - मराठी अनुवाद).

३-एप्रिल-२०१६

Comments

Popular posts from this blog