अमृतकुंड - War Redefine भाग १ - प्रारंभ


विभीषन

लंकेच्या सागरा किनारी शिबिरात आम्ही चर्चा करत बसलो होतो. मध्यभागी निलवर्णीय श्रीराम, त्यांच्या उजव्या



बाजुला सुग्रीव आणि जांबुवन, डाव्या बाजुला मी आणि शेजारी नल, नील आणि काही वानर सैनिक उभे होते.

आतापर्यंत झालेल युद्ध जणू एका नाटकी खेळासारखच होत. आम्हा राक्षसांचे सगळ्याच महत्वांच्या सेनानायकांचा नायनाट रामाने केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामाने प्रत्यक्ष युध्दात एकदाच भाग घेतला होता, तोही फक्त कुंभकर्ण वधाच्या वेळेस. रामाच युद्धकौशल्य मी तेव्हा अगदी जवळून पाहिल होत. त्यांच युद्धकौशल्य, कुटनिती, तल्लख बुद्धी, संभाषणचातुर्य अगदी सगळ काही विलक्षण होत. एका मनुष्याला हे सगळ करण खरच शक्य आहे याबाबत मी जरा सांशकच होतो. परंतु भगवान विष्णुने एक साधारण मानवाचा अवतार घेऊन हे सगळकाही एका मानवाच्या अवाक्यात आणल होत. म्हणुनच तेच विष्णूचा अवतार आहे, यावर माझा विश्वास अधिक दृढ होत चालला होता.

तेवढ्यातच एक वानर सैनिक आत आला. किमान आठ फुट उंचीचा, साधा कटी वस्त्र परिधान केलेला आणि हातात भली मोठी गदा. वानर! राक्षस आणि मानवांच्या मध्य असलेले जीव. राक्षस यासाठी कारण युद्धात लागणारी राक्षसारखी हिंसक प्रवृत्ती त्यांच्याजवळच होती. आणि मानव यासाठी कारण त्यांची संस्कृती, राहणीमान, जीवनमान मानवासारखच होत. त्याची उपजीविका फळे, झाडाची कंदमुळे यावरच चालायची. शक्यतो वानर नेहमीच मानवासारखे शांत राहायचे, पण जर आव्हान दिल तर त्यांच्यातली हिसंक प्रवृत्ती उफाळुन यायची. राक्षस बलवान तर होतेच, परंतु वानरांएवढे चपळ नव्हते. वानर दिवसभर न थांबता युद्ध करु शकत होते. आणि यामुळेच फक्त वानरच राक्षससांच आव्हान पेलु शकत होते, आणि रामाने हे जाणले होते. त्यांना निवडण्यात त्यांनी जराही चुक केली नव्हती.

श्रीरामाला अभिवादन करून बोलू लागला.

"प्रभु शुभ समाचार आहे"
"लक्ष्मण, हनुमान, अंगद आणि आदि वानर लंकेतून परत येत आहे"
"त्यांनी इंद्रजीताची तपस्या भंग करून त्याला यमसदनी धाडण्यात यश मिळवल आहे"

एवढे वृत्त सांगुन तो निघून गेला. समाचार एेकुन सगळेच सुखावले होते. थोड्याच वेळानंतर लक्ष्मण, हनुमान, अंगद आदिंनी शिबीरात प्रवेश केला. सगळ्यांना प्रणाम करुन तो माझ्या बाजुच्या मंचकावर विराजमान झाला आणि घडलेला सगळा वृतांत तो कथन करु लागला. क्षणभर माझी दृष्टी समोर रामाच्या बाजुला उभ्या असलेल्या हनुमानावर स्थिरावली. धिप्पाड देहाचा तो वानर मला रामानंतर सर्वात प्रिय होता. केवळ त्याच्यामुळेच मला राम भेटीचा योग आला होता. दोन्ही पायामंधे थोड अंतर राखुन तो उभा होता. त्याच्या हातात त्याची प्रिय गदा होती. गदेच भल मोठ गोलाकार धुड आणि त्याच्यातुन निघालेल निमुळता आकाराच टोक जमीनीला टेकवल होत. त्या गदेचा दांडा त्या कमरेपर्यंत उंच होता. दांड्याच्या पृष्ठभागावर आपले दोन्ही केसाळ हात ठेऊन तो शांतचित्ताने ऐकत उभा होता. क्षणातच त्याची दृष्टी माझ्याकडे वळली, आम्ही दोघांनीही स्मितीत नजरेने एकमेकांना प्रणाम केला. पवनदेवाच्या या पुत्राला भगवान शंकर, ब्रम्हा, देवराज इंद्र, कुबेर, यम यांनी त्याच्या लहानपणीच विशेष शक्तींनी युक्त असे वर प्रदान केले होते.

इंद्रजीताचा वध झाला होता. परंतु यावर मी शोक व्यक्त करावा की आनंद हे मला कळतच नव्हत. आता पुढे युद्धात काय होणार याचीच हुरहुर मला लागून होती. माझा चिंताग्रस्त चेहरा बघताच श्रीराम म्हणाले.
"चिंतीत दिसतोय विभिषणा! असा कुठला प्रश्न आहे जो तुला व्यथित करतो आहे? संकोच करु नकोस, मन मोकळ कर."

लक्ष्मण वगळता सगळेच सहसा श्रीरामाला प्रभुच म्हणायचे. फक्त लक्ष्मण श्रीरामाला दादा म्हणून हाक मारायचा. चिंतीत मुद्रा श्रीरामाकडे करुन मी पुढे बोलु लागलो.

"प्रभु, आतापर्यंतच्या निर्णयायक युद्धात राक्षसांचे सगळेच प्रमुख योद्धे मारले गेले आहेत, आता दादा प्रत्यक्ष स्वतः युद्धात उतरेल"

"परंतु यातला तुला चिंतीत करणारा विषय कोणता?" श्रीराम म्हणाले.

श्रीराम मोजकच बोलायचे पण विषयाला धरूनच बोलायचे. त्यांच संभाषण चातुर्य त्यांच्या शब्दा-शब्दातुन व्यक्त व्हायच. संभाषण कोणतही असो, मन तर ते जिंकणारच.
मी पुढे बोलु लागलो

"प्रभु, दादा चौसष्ट कला आणि शस्त्रास्त्रविद्यांमधे पारंगत आहे. युद्धाचे सगळेच डावपेच तो कोणतेही नितीनियम न मोडता खेळतो. तुम्ही मानव आणि तो राक्षस असल्यामुळे तुमच्या आणि त्याच्या मधल्या शारीरीक बलाचा फरक आपण भरून काढू शकत नाही. राजकारणाच्या बाबतीत त्यासारखा खरा मुसद्दी राजकारणी कुणीच नाही. सगळ्याच प्रकारच्या युदधकलामंध्येही तो पारंगत आहे. अस्त्रामधल श्रेष्ठ अस ब्रम्हानं दिलेल ब्रम्हास्त्र आणि शस्त्रामधल श्रेष्ठ अस शंकरान दिलेल अस चंद्रहास त्याच्याजवळ आहे. मायावी युद्धात आजपर्यंत कुणीही त्याला हरवु शकल नाही आणि त्यामधल असलेल त्याच्या तोडीच कौशल्य आता कुठल्याही राक्षसात नाही, म्हणुनच तो आज त्रीभुवनाधिपती आहे. तो सर्वश्रेष्ठ शिवभक्त आहे, तो अजेय आहे, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे, तो अमर आहे"
शिबीरात भयाण शांतता पसरली. सगळ्याच उपस्थितांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले होते.  माझ बोलण श्रीरामान शांत चित्तान ऐकुन घेतल. चिंता किवा भितीचा थोडासुद्धा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. ते पुढे बोलु लागले

"तु ज्या प्रश्नांच्या बाबतीत चिंताग्रस्त आहे त्याची सगळी उत्तरे येणाऱ्या भविष्यकाळात तुला नक्कीच मिळेल. पण रावण अमर आहे या बाबतीत मी अजुनही सांशकच आहे. तु खरच हे मानतो की तो अमर आहे?"

"हो प्रभु, त्याबाबतीत मला तिळमात्रही शंका नाही" मी म्हणालो.

"विभिषना, मला एक गोष्ट अजुनही कळली नाही" काहीसा विचार करून श्रीराम पुढे म्हणाले.
"कोणती प्रभु?".
"रावण जगजेत्ता आहे. तिन्ही लोकांनवर त्याची सत्ता आहे. या जगातला तो सगळ्यात बुद्धीमान आणि शक्तीशाली राक्षसही आहे. तरीही तो सितेच्या मोहाला बळी पडला हे खचितच आश्चर्यदायी आहे"
"प्रभु! माता सिता कदापी त्याचा स्विकार करणार नाही हे तो यथाचित जाणून आहे"
"हा सगळा परिणाम नंदिने दिलेल्या शापाचा आहे" त्यांच्या प्रश्नांकित मुद्रेकडेे बघत मी पुढच बोलन चालु ठेवल.

"परंतु नंदिचा शाप तर केव्हाचाच खरा ठरला आणि त्याच्या शापवाणीप्रमाणे हनुमानाने केव्हाच लंकादहन सुद्धा केल" मधातच सुग्रीव म्हणाला.

"चुकताेयस तु सुग्रीवा! तेव्हा नेमक काय झाल होत हे ऐक. एकदा शंकरांने नंदिला आज्ञा दिली होती, की ते माता पार्वतीसोबत एकांतात आहे, कोणालाही कैलासावर प्रवेश देऊ नये. थोड्याच वेळात दादा तिथे पोहोचला, पण नंदिने त्याची वाट अडवली. तेव्हा त्याने क्रोधात येऊन नंदीशी युद्ध पुकारले. युद्धाचा कोणताही निकाल लागत नसल्याचे दिसुन येताच दादाने आपल्या दहा मस्तकांच्या साथीने नंदीची थट्टा सुरु केली. नंदी काहीही न बोलता शांतपणे ऐकतच राहीला. परंतु थट्टेच्याच भरात जेव्हा त्याने चुकून शंकराचीच थट्टा आरंभली, तेव्हा मात्र नंदी क्रोध अनावर झाला आणि  त्याच्या मुखातुन शापाग्नी बाहेर पडला"

"हे मुर्ख रावणा, ज्या शंकराची तु भक्ती केलीस, ज्याच्याकडुन वर प्राप्त करुन तु दशानन झालास आणि ज्या भक्तीने तु स्वतःला सर्वश्रेष्ठ शिवभक्त म्हणुन सर्वत्र मिरवतोस, त्याच माझ्या प्रिय शंकराची तु थट्टा केलीस, त्यांचा अपमान केलास. हे मुर्ख अहंकारी राक्षसा, हे तुझे दहा मुख जसे दहा गुणांवर विजय मिळवल्याचे प्रतिक आहेत, तेच दहा गुण एक दिवस तुला गुलाम बनवतील आणि तेच तुझ्या अध:पतनाचे कारण ठरेल, हा माझा तुला शाप आहे. आणि मला तु एक तुच्छ प्राणी म्हणुन संबोधलास आणि स्वतःला श्रेष्ठ म्हणालास. हे रावणा हा माझा तुला दुसरा शाप आहे, एक वानर तुझ्या पुर्ण लंकेचा निपात करेल, आणि तु काहीही करु शकणार नाही"

"दादा तिथुन निघुन गेला. त्यानंतर काय झाल हे सगळ्यांना माहितच आहे." मी म्हणालो.
 कुटीतला सगळा जमाव शांतपणे सगळ ऐकत होता. मी पुढे बोलु लागलो.

"त्याला शंकराच चंद्रहास प्राप्त तर झालच, पण तो सोबत दोन शाप सुद्धा घेऊन परतला. त्या दिवसानंतर तो विचित्र वागु लागला होता. त्याच्यातल्या सगळ्याच वुत्ती बळावल्या होत्या. तो शीघ्रकोपी आणि अविचारी बनला होता. वाट्टेल ते करण्याची सवयच त्याला जडली होती.
स्त्रीयांना तो फक्त उपभोगाचे साधन समजत असे, त्यामुळे त्याची वासनीक वृत्ती बनली होती. नलकुबेराची होणारी पत्नी रंभा सुद्धा त्याच्या या वृत्तीला बळी पडली. परंतु नलकुबेराने त्याला शापदग्द केले. त्यामुळे तो कोणत्याही स्त्रीच्या ईच्छेविरुद्ध तिला मिळवु शकत नव्हता, आणि म्हणुनच त्याचा क्रोध दिवसेंदिवस वाढत चालला होता.

त्यानंतर पंचवटीतील घडलेला वृत्तांत शुर्पनखेने त्याला सांगितला आणि त्याचा अहंकार डिचवला. मग त्याच्याच अहंकाराने त्याच्या क्रोधाचा अग्नी अधिक बळकट केला. वालीचा वध श्रीरामाच्या हातुन झाला आहे, हे कळल्यावर त्याला स्वतःच्याच बळावर घृणा येऊ लागली, कारण वालीने फक्त एकाच हाताने त्याला स्वतःच्याच काखेत दाबुन त्याची दयनीय स्थिती केली होती. शुर्पनखेसोबत झालेल्या प्रकाराचा त्याला पश्चाताप होऊ लागला. एका साधारण मनुष्याने शक्तीमान वालीचा वध केला,  पंचवटीत तुम्ही दोघाही भावांनी केलेला पराक्रम आणि तुमची वाढलेली किर्ती, यावरुन तो तुमच्याशी ईर्षा करु लागला. तुमचा वध करुन आपला तिन्ही लोकांवरचा दबदबा अधिक वाढावा असा लोभ त्याच्या मनात उचंबळुन येऊ लागला. मग त्याने माता सितेच्या अपहरणाचा कट रचला, आणि त्यांच्या दर्शनाने त्याचात मोह उत्पन्न झाला आणि स्वतःचे चित्त हरवुन बसला. अश्या प्रकारे आपल्या सर्व गुणांवर विजय मिळवलेला रावण (काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, घृणा, ईर्षा, पश्चाताप आणि चित्त), आपल्याच गुणांचा दास झाला.

मी क्षणभर एक उसासा टाकला आणि पुढे बोलु लागलो.
"दादाला या सगळ्या प्रकारामागच मुळ कारण प्रत्येकवेळेस समजवण्याचा मी प्रयत्न करत असे, पण मला नेहमी त्याची दुरुत्तरेच मिळत असे. शेवटी नाईलाजाने मला लंका सोडावी लागली".
आणि चर्चा तिथेच समाप्त झाली.

***

मध्यानिचा सुर्य वेगाने पुढे सरकत होता. आज युद्धाला विराम दिला गेला होता. दादा दुसऱ्या दिवशी पाहाटेच युद्धासाठी श्रीरामासमोर ऊभा ठाकणार होता. श्रीरामाच्या आदेशावरुन सुग्रीव भगवान शंकराच्या पुजेची सिध्धता करण्यासाठी निघुन गेला होता. श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि मी युद्धभुमीवरुन पाहणी करत फिरत होतो. युद्धभुमीवर कित्येक वानर आणि राक्षस सैनिकांच्या प्रेतांचा खच पडला होता. रक्ताने न्हावुन निघालेली सागराकिनावरची वाळु अजुनही रक्तात भिजण्यास आतुर होती. सर्वत्र गुलाबीच गुलाबी रंगाची वाळु पसरली होती. धारातीर्थी पडलेल्या सगळ्या वानर सैनिकांचे शव उचलुन त्यांच्यावर त्यांच्या शसत्रांसह अंतिम संस्काराचा विधी पार पाडण्यात येत होता. अंतिम संस्कारानंतर त्यांना स्वर्ग मिळणार, अशी मान्यता होती. दोन वानर सैनिक एका वानर सैनिकाचे शव उचलुन रचलेल्या चितेवर घेऊन जात होते. श्रीरामांची दृष्टी सागरावरच्या किनाऱ्यावर स्थिरावली होती. तिथे एका राक्षस सैनिकाचे शव पडुन होते. श्रीराम त्या शवाकडे वळले, त्यांच्या मागोमाग मी आणि हनुमान सुद्धा तिकडे वळलो.

त्या राक्षस सैनिकाच्या डोक्यावर जखम झाली होती. कदाचीत त्याच्या डोक्यावर जबरदस्त गदाप्रहार झाला असावा. त्याच्या शरीरावर अजुनही बऱ्याच जखमा होत्या, पण त्या डोक्याच्याच जखमेने त्याची प्राणज्योत मावळली हे मात्र निश्चित होते. त्याच्या जखमेतुन अजुनही रक्त वाहात होत, आणि येणाऱ्या लाटेच निलमय जल, रक्तमय होऊन सागरात परतत होत. श्रीरामाने चहुबाजुला दृष्टी वळवली. सगळीकडेच राक्षसांचे शव अस्ताव्यस्त पडले होते. ते दृष्य बघुन श्रीराम हनुमानाकडे वळले आणि म्हणाले
"मारुता! सर्व वानर सैनिकांना सांग, जेवढ्या आदराने मृत वानर सैनिकांचा दहन विधी होत आहे तेवढ्याच आदराने राक्षस सैनिकांचासुद्धा अंतिम संस्कार करा"

हनुमान निघणार तेवढ्यातच लक्ष्मण म्हणाला

"दादा, ते राक्षस सैनिक आहेत. त्यांनी अधर्माची बाजु घेऊन आपल्याशी युद्ध केलय. त्यांनी आपल्या सैनिकांचा नाश केला. तरीही तुला खरच वाटतय त्यांचा आदराने अंतिम संस्कार व्हायला पाहीजे?"

"अरे रावण हा आपला शत्रु, त्याने सीता मातेच अपहरण करुन केवढ मोठ अघोरी कृत्य केल. त्यातही जेव्हा आपण शांतीचा प्रस्ताव पुढे केला, तेव्हाही त्याने तो धुडकाऊन लावला. त्याच्या पुत्र इंद्रजीताने मायेचा आधार घेऊन कपटाने युद्ध केले. दादा! अशी कुठलीच निंदनीय गोष्ट नाही जी त्यांनी या युद्धात सोडली नाही."

"जर राक्षस स्वतः त्यांच्या मृत सैनिकांचा भार उचलण्यास वेळ घालवत नाही, तर मग आपण तरी हे कार्य का कराव? आणि ज्या राक्षसांच्या विनाशासाठी आपण हे युद्ध आरंभल, त्यात या राक्षस सैनिकांच्या अंतिम संस्कारासारख्या एका शुल्लक गोष्टीला एवढ महत्व का द्याव. आणि कितीही झाल तरी ते एक मृत शरीरच, उद्या चालुन ते नष्ट होणारच. तरीही तु म्हणतोय राक्षस सैनिकांचा अंतिम संस्कार आदराने करा. अरे जे वानर सैनिक कसलीच महत्वाकांक्षा न ठेवता आपल्या समेत सामील झाले, जे युद्धात लढले आणि जे स्वतःच्या प्राणालाही मुकले अश्या सैनिकांच्या शत्रुचा सन्मान आपण करावा, हा आपल्या वानर सैनिकांचा अपमान तुला वाटत नाही? दादा, आपण क्षत्रीय आहोत, आणि एका क्षत्रीयाने भावनांना मनात थारा देण म्हणजे तेवढच घातक आहे जेवढ कमरेला शस्त्राऐवजी विषारी साप बांधुन घेण"

लक्ष्मण स्वभावाने जरा तापट वृत्तीचाच होता. लक्ष्मणाने राक्षसांबद्दलचा मनात असलेला उरला सुरला सगळा क्रोध एका क्षणात बाहेर काढुन टाकला. राक्षसांबद्दल असलेला त्याचा क्रोध सहाजीकच होता. त्याच्या दादाने आणि सीता मातेने आतापर्यंत अनंत यातना भोगल्या होत्या. आपुलकीच्या नात्यांचा विरह काय असतो हे तो यथाचित जाणुन होता. त्याने बोललेला शब्द न शब्द व्यव्हारीकदृष्ट्या बरोबर होता. जर राक्षसांना स्वतःच्या सैनिकांच्या अंतिम संस्काराची काळजी नव्हती, तर ती श्रीरामानेसुद्धा का करावी? हा प्रश्न मलासुद्धा भेदुन गेला.

श्रीराम समुद्रातल्या अनंताकडे बघत शांतपणे दोन्ही हात मागे बांधुन ऊभे होते. संथ गतीने वाहणारी हवा श्रीरामाचे केस लयीत हलवत होती. मी आणि हनुमान कानात प्राण एकवटुन श्रीराम काय म्हणणार याची वाट पाहू लागलो. श्रीरामाची नेहमीचीच शांत धीरगंभीर मुद्रा आता सुर्याच्या तेजाप्रमाणे भासु लागली.

"लक्ष्मण! मृत्यु हे या जिवनातल अंतिम सत्य आहे. जसा मुत्यु त्या सैनिकांना आहे, तसाच तो मला आणि तुलासुद्धा आहे. राक्षस, मानव, वानर आणि ईतर प्राणी हे भिन्न आहे हे तितकच सत्य आहे, जितक मृगजळाच पाणी.

"अरे, हे युद्ध फक्त सितेला परत मिळवण्यासाठीच नाही, तर हे एका स्त्रीवर झालेला अपमानासाठी सुध्दा आहे. सगळ्या स्त्रीयांच्या अपमानाचा भार आज सितेच्या खांद्यावर आहे, तसच सगळ्यांना योग्य तोच न्याय मिळावा ही आपली जबाबदारी आहे"

"शक्ती आणि साम्राज्याने हपापलेला जीव अहंकाराच्या सिहासंनावर विराजतो. लोभ आणि मोह त्याला वासनेची मदिरा प्राशन करायला लावतात. जितकी तो ती प्राशन करतो, तितकीच त्याची तृष्णा अधिक वाढत जाते. ती तृष्णा कधीही भागत नाही. ईर्षा आणि घृणा त्याला जराही स्वस्थ बसु देत नाही. मग तो स्वतःच्याच अहंकाराच्या आसनाचा भार इतरांना उचलायला लावतो. हे सगळे अगुण त्याला यशाच्या भ्रामक शिखरावर घेऊन जातात, आणि तो इतरांनाही त्याच्यासोबत त्याच मार्गावर चालायला भाग पाडतो. सत्ता, साम्राज्य आणि शक्तीच्या मोहात गुरफटुन स्वतःच्याच पापांचा शिखर चढत राहतो. जेव्हा तो त्या शिखराचा उच्चांक गाठतो, तेव्हा हेच अगुण त्याला व इतरांना तिथुन ढकलुन देतात, आणि हेच त्यांच्या अध:पतनाचे कारण ठरतात"

"अशीच स्थीती आज रावणाची आहे, आणि त्याच्याच अहंकाराचा भार उचलता उचलता हे राक्षस सैनिक धारातीर्थी पडले आहे. लक्ष्मणा! राक्षसांबद्दल असलेला तुझा क्रोध साहाजिक आहे. पण ही गोष्टसुद्धा लक्षात घे, ज्यांची तु ईतकी घृणा करतोस, त्यांचातलाच एक स्वतःच्याच भावाशी विद्रोह करुन आपल्या मदतीसाठी धाउन आला आहे. त्यानेसुद्धा आपले आप्त या युद्धभुमीवरच गमावले आहे. आणि मृत्यु आल्यावर कोण मित्र आणि कोण शत्रु. प्रत्येक क्षत्रीय मनात एकच ध्येय घेऊन चालत असतो, ते हेच की मृत्यु यावा तो फक्त समरांगणावरच, अन्य कुठेही नाही. मग मृत्युपरांत आपण त्याला तो सन्मान का नाही द्यावा. लक्ष्मणा! एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपण चांगले क्षत्रीय असो किंवा नसो, पण एक चांगले मानव नक्कीच असलो पाहीजे".

श्रीरामाच्या उत्तराने लक्ष्मण निरुत्तर झाला.

***

युद्धाचा निर्णायक दिवस उजाळला. सकाळची सगळी आन्हीक आटपुन मी माझ्या शिबीरातुन बाहेर पडलो. सोबतीला लंकेतुन आलेले दोन राक्षस होतेच. राम, लक्ष्मण आणि इतर योद्धे केव्हाच युद्धभुमीवर निघुन गेले होते. झपाझप पावले टाकत मी युद्धभुमी गाठली. वानर सैनिकांच्या गराड्यातुन पुढे जात मी हनुमंताजवळ ऊभा झालो. पुष्कळ वानर सैनिक अजुनही युद्धाच्या तयारीला लागलेच होते. सगळ्यात समोर श्रीराम ऊभे होते. एका योजनाच्या अंतरावर आमची प्रशस्त अशी लंकानगरी स्तब्धपणे ऊभी होती.

मी श्रीरामाच्या पाठमोऱ्या निलमय शरीराकडे बघतच राहीलो. त्यांचे घट्ट पिळादार बाहु, उन्नत स्कंध, रेखीव शरीरयष्ठी एका क्षत्रीयाला साजेशीच होती. जमिनीत घट्ट पाय रोवुन एका वेगळ्याच पण विलक्षण अश्या अात्मविश्वासात ते ऊभे होते. एका हातात धनुष्य, पाठीवर बाणांचा भाता बांधला होता. चौदा वर्षाच्या प्रदिर्घ वनवासामुळे डोक्यावरच्या केसांचा जुडा झाला होता. जणुकाही भगवान शंकरच युद्धभुमीवर ऊभे असल्याचा भास होत होता.

अचानक लंकेच्या तटबंदीच्या प्रवेशद्वारामागुन राक्षससैन्याच्या रणदुंदुभी आणि रणवाद्यांचा प्रचंड ध्वनी ऐकु येऊ लागला. संपुर्ण युद्धभुमीवर त्या ध्वनींचे पडसाद घुमू लागले. हळुहळु ते प्रवेशद्वार उघडु लागल. दुरुनच आम्हाला राक्षस सैनिकांच्या हालचाली दिसु लागल्या. आता युद्ध एक निर्णायक वळण घेणार होत कारण आज दादा स्वतः युद्धात उतरणार होता.

या युद्धाअंती एकाला अधम कोटीच स्थान प्राप्त होणार होत, तर दुसरा इतिहासाच्या सर्वोच्च शिखरावर स्थानापन्न होणार होता.
एका बाजुला माझा दादा,
जो अजेय, जो अमर
जो एक सर्वश्रेष्ठ शिवभक्त, जो एक उत्कृष्ठ वीणावादक
जो एक सर्वोत्तम रचनाकार, जो विद्वानातलाही विद्वान
जो एक सर्वश्रेष्ठ ब्राम्हण, जो एक जगजेत्ता
आणि एकीकडे फक्त श्रीराम.

आयुष्याच्या युद्धभुमीवर रचलेल्या या विलक्षण संग्रामाकरीता नियतीने आम्हाला  निवडले होते. त्या विलक्षण क्षणांचे आम्ही सगळेच साक्षी झालो.

क्रमश:

Comments

Post a Comment

Popular posts from this blog